नेतान्याहू यांना बेरूतवर हल्ला करण्यापासून रोखल्याचा ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन, 02 जून (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लेबनानची राजधानी बेरूतवर मोठा लष्करी हल्ला करण्यापासून रोखले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या
नेतान्याहू यांना बेरूतवर हल्ला करण्यापासून रोखल्याचा ट्रम्प यांचा दावा


वॉशिंग्टन, 02 जून (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लेबनानची राजधानी बेरूतवर मोठा लष्करी हल्ला करण्यापासून रोखले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या विनंतीनंतर नेतान्याहू यांनी आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचे आदेश दिले.

सोमवारी संध्याकाळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी लिहिले, “आज माझी बीबी (बेंजामिन नेतान्याहू) यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना बेरूतवर मोठा हल्ला टाळण्याची विनंती केली आणि त्यांनी आपल्या सैनिकांना परत बोलावले. धन्यवाद, बीबी.” हा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिकन माध्यमांनी ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील संभाषण अत्यंत तणावपूर्ण आणि वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. वृत्तांनुसार, इस्रायली हल्ल्यांमुळे इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेतून बाहेर पडण्याची धमकी दिल्यानंतर ही दूरध्वनीवरील चर्चा झाली.

यापूर्वी नेतान्याहू यांनी इशारा दिला होता की, हिजबुल्लाहने इस्रायलवरील हल्ले थांबवले नाहीत, तर बेरूतमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले जाईल.

ट्रम्प यांनी असा दावाही केला की, त्यांनी हिजबुल्लाह नेतृत्वाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असून त्यांनी इस्रायल आणि इस्रायली सैनिकांवरील गोळीबार थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांच्या मते, इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल कारवाई थांबवण्यास मान्यता दिली आहे. ही व्यवस्था किती काळ टिकते ते पाहूया. ती कायमस्वरूपी टिकेल, अशी आशा असल्याचे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, अमेरिकन वृत्तसंस्थाच्या अहवालात ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील संभाषणादरम्यान वातावरण अत्यंत तापले होते, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांना खडसावले. एका अन्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांनी हल्ला थांबवण्यासाठी नेतान्याहू यांच्यावर दबाव आणला, त्यानंतर इस्रायली पंतप्रधानांनी त्यास सहमती दर्शवली. दरम्यान, माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने चर्चा स्थगित केल्याची माहिती त्यांना आधी देण्यात आली नव्हती. मात्र, चर्चा थांबली तरी त्यात काही असामान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्याच्या अखेरीपासून ते सोमवारीपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यात हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवायांचे सत्र सुरूच राहिले. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धविरामावर संकट अधिक गडद झाले आहे. युद्धविराम लागू असला तरी इस्रायलने लेबनानमधील लष्करी मोहिमा सुरूच ठेवल्या आहेत. अलीकडेच इस्रायली सैन्याने लेबनानमध्ये गेल्या 26 वर्षांतील सर्वात खोलवर लष्करी घुसखोरी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande