
सोलापूर, 02 जून (हिं.स.)। मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी एका मौलानाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना मोहम्मद उमर रिझवी याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी मदरशात आली असता आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. घडलेला प्रकार मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड