
रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी राजापूर पालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत शहरातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून ३९७ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे.
धोकादायक झाडे, जीर्ण व धोकादायक इमारती तसेच पूर किंवा दरडसदृश संकटाचा धोका असलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना स्थलांतराबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. धोकादायक झाडांच्या मालकांना ३७, धोकादायक इमारतींच्या मालकांना ५७ तर सन २०२६ च्या पावसाळ्यात धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थलांतर करण्याबाबत ३०३ अशा एकूण ३९७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तहसीलदार कार्यालय व राजापूर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये संबंधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन अथवा प्रशासनावर राहणार नसल्याचेही नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी