
अमरावती, 26 जून (हिं.स.)। अमरावती शहर गुन्हे शाखेने इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या अवैध साठ्यावर धाड टाकून २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (२६ जून) केडिया नगर परिसरातील गजानन टॉवर अपार्टमेंटमध्ये करण्यात आली.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, आशिष बाबुराव कडू (वय ४०) हा प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्रीच्या उद्देशाने फ्लॅटमध्ये मोठा साठा करून ठेवत आहे. त्यानुसार पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला असता स्टोअर रूममधून SELFBAR RAYA S1 कंपनीच्या विविध फ्लेवरच्या ५५ रिचार्जेबल डिस्पोजेबल इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त करण्यात आल्या.
जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ७५ हजार रुपये असून आरोपीविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २७५ तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम, २०१९ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी