
बीड, 24 जून (हिं.स.)। मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून अपुऱ्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. २२ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ९.५% पावसाची नोंद झाली असून, एकूण क्षेत्राच्या केवळ १० टक्के म्हणजेच ८३ हजार ८९४ हेक्टरवरच पेरण्या शक्य झाल्या आहेत. परिणामी, १५ ते ३० जून दरम्यान घेतली जाणारी मूग आणि उडीद या पिकांची पेरणीची वेळ निघून गेल्याने हा हंगाम आता पूर्णपणे वाया गेला आहे.
ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर विसंबून पेरण्या केल्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला दिला आहे. आता आगामी काळात पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर आणि सूर्यफूल या पिकांवरच भर द्यावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis