जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमधून अजगराच्या पिल्लाची सुटका
मुंबई, 24 जून (हिं.स.) - दिनांक २४.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर, गाडी क्र. 12052 मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमधून भारतीय अजगर जातीच्या एका पिल्लाची सुटका करण्यात आ
अजगर पिल्लू


मुंबई, 24 जून (हिं.स.) - दिनांक २४.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर, गाडी क्र. 12052 मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमधून भारतीय अजगर जातीच्या एका पिल्लाची सुटका करण्यात आली.

दिनांक २४.०६.२०२६ रोजी, गाडी क्र. 12052 मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. ११ वर पहाटे ००:४५ वाजता दाखल झाल्यानंतर, श्री एन. के. पारसोया इंजिन क्र. 22936/एसआरसी/सीएबी2/डब्ल्यूएपी4 चे लोको पायलट यांना 'कॅब क्र. २' मध्ये अजगराचे पिल्लू दिसले. त्यांनी ही बाब त्यांचे कार्यभार स्वीकारणारे श्री ओमप्रकाश राम, लोको पायलट यांना कळवली.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आणि त्यानंतर श्री अभिषेक अशोक ठवरे मानद प्राणी कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. योग्य ती खबरदारी घेऊन आणि रेल्वेच्या कामकाजात कोणताही व्यत्यय न आणता, पहाटे १:४० च्या सुमारास या अजगराच्या पिल्लाची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. नंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

भारतात आढळणारा 'इंडियन रॉक पायथन' हा बिनविषारी साप असून 'भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तो संरक्षित प्रजातीमध्ये मोडतो. अन्नसाखळीतील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.

हा काळ अजगराची अंडी उबण्याचा आणि त्यातून पिल्ले बाहेर पडण्याचा असतो. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे, वन्यजीव अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये किंवा सुरक्षित वाटणाऱ्या इतर ठिकाणी आश्रय घेतात. पावसापासून बचाव किंवा आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने अजगराचे हे पिल्लू रेल्वेच्या इंजिनमध्ये शिरले असावे आणि अशा प्रकारे ते या ठिकाणापर्यंत पोहोचले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अशा घटना पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही वेळी घडू शकतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता किंवा सापाला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न न करता, वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी त्वरित संपर्क साधावा. वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊनच अशा प्रकारे सुटकेची मोहीम राबवणे आवश्यक आहे.

मध्य रेल्वे आपल्या लोकोमोटिव्ह कर्मचाऱ्यांची तत्परता आणि प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी केलेल्या वेळेवर मदतीचे कौतुक करते; ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर कोणताही परिणाम न होता ही सुटका यशस्वीरीत्या पार पडली. ही घटना मध्य रेल्वेची सुरक्षितता, संकटकाळात त्वरित प्रतिसाद आणि वन्यजीव संरक्षणाप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करते. पावसाळ्यात प्रवाशांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच वन्यजीव आढळल्यास त्यांची योग्य व सुरक्षित हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कळवावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande