
परभणी, 24 जून (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील बोरी आणि चारठाणा येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविण्यात आला असून या संदर्भातील गैरसमज दूर झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण व आंदोलन मागे घेतले आहे. चारठाणा आणि बोरी येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे प्राथमिक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी अपर तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी भूमिका जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सातत्याने शासन स्तरावर मांडली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, बोरी येथे अपर तहसील कार्यालयास मंजुरी मिळालेली नसल्याच्या गैरसमजातून काही नागरिकांनी आंदोलन व उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी बोरी तसेच चारठाणा येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच संबंधित प्रस्तावाची प्रतही आंदोलनकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. प्रशासनाकडून वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर निर्माण झालेले गैरसमज दूर झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बोरी आणि चारठाणा येथील नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी अपर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis