
रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । रायपाटण (ता. राजापूर) येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली असून या प्रस्तावाबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाचल, सौंदळ, तळवडे या महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यास तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना महसूल प्रशासनाच्या विविध सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.
विद्यमान राजापूर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राजापूर, ओणी, कोंड्ये तर्फे सौंदळ, हातिवले, कुंभवडे, जैतापूर, नाटे, वाडापेठ आणि भू ही मंडळे कायम राहणार आहेत.
प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबत कोणत्याही व्यक्तीस हरकत अथवा सूचना असल्यास त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, राजापूर किंवा तहसीलदार, राजापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे यांनी प्रसिद्ध केलेल्या या सूचनेनुसार प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी