
निखिल बनकर यांचे मरणोत्तर नेत्रदान, मातेने बजावली महत्त्वाची भूमिका
अमरावती, 24 जून (हिं.स.) : तरुण मुलगा आजारपणात दगावल्यानंतर आक्रोश करणाऱ्या एका मातेने आपले दुःख थोडावेळ बाजूला सारून आपल्या निधन पावलेल्या मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या घटनेमुळे डोळ्यांत अश्रू असलेल्या एका मातेने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
राजापेठ परिसरातील रहिवासी असलेले निखिल रमेश बनकर (वय ३५) यांना आजारपणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. आपल्या मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकताच मातेने एकच हंबरडा फोडला. पुत्रवियोगातील मातेच्या आक्रोशामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा परिसर सुद्धा सुन्न झाला होता. आई कुंदाताई बनकर यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. त्यांची ही वेदना पाहून या वॉर्डातील परिचारिका, डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले. अशा मन हेलावून टाकणाऱ्या दुःखद वातावरणात आईने आपल्या मुलाचा मृतदेह मांडीवर घेतला. मात्र डोळ्यांतील अश्रू आणि हृदयातील दुःख बाजूला सारत कुंदाताईंनी आपल्या मुलाच्या रूपाने कुणीतरी हे जग पाहू शकेल, या विचाराने मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच तेथील डॉक्टरांनी हरिना नेत्रदान समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यानंतर सामान्य रुग्णालयातील डॉ. पवार, डॉ. नीलेश ढेंगले, परिचारिका सपना धंदर, समीक्षा भोवते यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी नेत्रदानात महत्त्वाची भूमिका बजाविणारे हरिना फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज राठी, शरद कासट, मनीष सांवला, राजेंद्र पचगाडे यांच्यासह मृत निखिलचे वडील रमेश बनकर, आई कुंदाताई बनकर, भाऊ स्वप्निल बनकर, श्रीराम बनकर, राजेश बनकर, क्रिश बनकर, सुनील बनकर, रोहित बनकर उपस्थित होते. सर्वांच्या वतीने नेत्रदान करणाऱ्या दिवंगत निखिल बनकर यांना श्रद्धांजली देऊन सामान्य रुग्णालय व हरिना फाउंडेशनद्वारे बनकर कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी