
रायगड, 25 जून (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील नवखार-मोरपाडा येथील ज्येष्ठ शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम शंकर पाटील (वय ८१) यांचे मेंदूविकाराच्या झटक्याने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने नवखार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, तीन सुना, सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आत्माराम पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते. शेती क्षेत्रात विविध प्रयोग करण्याची त्यांना आवड होती. आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन आणि शेतीतील नव्या संकल्पनांबाबत ते नेहमीच मित्रमंडळींना एकत्र करून चर्चा करीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील अनेक शेतकऱ्यांना झाला होता.मनमिळाऊ, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव असल्याने खारेपाठ विभागात त्यांचे मोठे सामाजिक वर्तुळ निर्माण झाले होते. समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे ते परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
उन्हाच्या तीव्र त्रासामुळे त्यांना मेंदूविकाराचा झटका आल्याने प्रथम अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर नवखार-मोरपाडा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)