
लातूर, 26 जून (हिं.स.)।
सामाजिक न्याय, समता आणि प्रगतीचा विचार समाजात रुजवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी विरोधी पक्षनेते देविदास काळे, गटनेते दीपक मठपती, मंडल अध्यक्ष, नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांचा पुरस्कार करत समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या पुरोगामी आणि मानवतावादी विचारांनी समाज परिवर्तनाची दिशा दिली असून आजही ते प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत.
यावेळी उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावाची मूल्ये अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis