झारखंडमध्ये भीषण अपघातात बँड पथकातील आठ कलाकारांचा मृत्यू
- मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त रांची, 26 जून (हिं.स.)। झारखंडमधील रामगड-बोकारो राष्ट्रीय महामार्ग-२३ वर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात बँड पथकातील आठ कलाकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारलौंग ये
JH EIGHT DEAD RAMGARH ACCIDENT CM GRIEF


- मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

रांची, 26 जून (हिं.स.)। झारखंडमधील रामगड-बोकारो राष्ट्रीय महामार्ग-२३ वर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात बँड पथकातील आठ कलाकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारलौंग येथील बुध बाजाराजवळ एलपी ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघांनी उपचारा दरम्यान प्राण गमावले.

प्राथमिक पोलीस तपासात ट्रक चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चुकीच्या दिशेने (राँग साईडने) येत होता, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारंगमर्चा गावातील अनोद कुमार (वडील धनुराम ओहदार), पप्पू करमाली (वडील दिलीप करमाली), पवन करमाली (वडील स्वर्गीय लखी करमाली), अशोक कुमार (वडील गल्लू डोम), शक्ती कुमार (वडील गल्लू डोम), डेव्हिड करमाली (वडील अमित करमाली) तसेच हजारीबाग जिल्ह्यातील दाढी प्रखंडातील कठहरवा गावचे मनीष कुमार (वडील श्रीकांत महतो) आणि हेमंत कुमार महतो (वडील सोहन महतो) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन रामगड सदर रुग्णालयात करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजरप्पाकडून रामगडकडे येणारा एलपी ट्रक (जेएच-०२ एए-४७८६) आणि विरुद्ध दिशेने जाणारी पिकअप व्हॅन (जेएच-०२ क्यू-८२६८) यांची बारलौंगजवळ समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअप व्हॅनचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यामध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना तत्काळ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका अन्य जखमीला अधिक उपचारासाठी रांची येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर सदर रुग्णालयातील वातावरण अत्यंत हृदयद्रावक झाले होते. मृतांचे मृतदेह आणि जखमी रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच रामगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) आलोक रंजन, रजरप्पा पोलीस ठाण्याचे प्रभारी कृष्ण कुमार तसेच रामगड पोलीस ठाण्याचे प्रभारी नवीन प्रकाश पांडे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.

पोलिसांनी सांगितले की, बलसगरा येथून दोन जण पिकअप व्हॅन घेऊन मारंगमर्चा गावात आले होते. तेथून गावातील आणखी सहा बँड कलाकारांना घेऊन सर्वजण लग्न समारंभासाठी बलसगराकडे निघाले होते. त्याचवेळी बारलौंगजवळ भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने आलेल्या एलपी ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा निष्काळजीपणा हा अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सोशल मीडिया 'एक्स'वर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, लारी-बारलौंगजवळ झालेल्या रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अत्यंत वेदनादायी आहे. मरांग बुरू यांच्या चरणी दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

हेमंत सोरेन यांनी सांगितले की, राज्य सरकार या दुर्घटनेतील प्रभावित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत व बचावकार्य अधिक वेगाने राबविण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande