मुंबईत मोहरम दरम्यान पेन किलरच्या नावाखाली विषारी कॅप्सूल वाटप; आरोपी ताब्यात
मुंबई, 27 जून (हिं.स.)। मुंबईतील भायखळा परिसरात मोहरम मिरवणुकी दरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना वेदनाशामक औषध असल्याचे सांगून विषारी कॅप्सूल वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या कॅप्सूलचे सेवन क
Toxic capsules distributed ainkillers during Muharram Mumbai


मुंबई, 27 जून (हिं.स.)। मुंबईतील भायखळा परिसरात मोहरम मिरवणुकी दरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना वेदनाशामक औषध असल्याचे सांगून विषारी कॅप्सूल वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर काही तरुणांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात विषारी कॅप्सूल आणि उंदीर मारण्याचे रसायन जप्त करण्यात आले आहे. असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आग्रीपाडा विभागाचे पोलीस उपायुक्त जयंत मीना आणि त्यांच्या पथकाने मिरवणुकी दरम्यान एका संशयित व्यक्तीकडून नागरिकांना कॅप्सूल वाटल्या जात असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने या कॅप्सूल वेदनाशामक असल्याचा दावा करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या मोबाईलसह कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

अटक करण्यात आलेल्या ३९ वर्षीय आरोपीचे नाव फैयाज प्रेमजी असून तो पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल १४ हजार ९०० तयार विषारी कॅप्सूल आणि सुमारे ५० किलो झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत घातक रसायन जप्त केले. आरोपीने प्रत्येक कॅप्सूलमध्ये एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरून त्या तयार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासात त्याने ऑनलाईन पद्धतीने ३० हजार रिकाम्या कॅप्सूल आणि मोठ्या प्रमाणात हे विषारी रसायन मागवल्याची माहितीही समोर आली आहे.

वेळीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे. हजारो विषारी कॅप्सूल नागरिकांपर्यंत पोहोचल्या असत्या तर अनेकांचे जीव धोक्यात आले असते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी कॅप्सूल तयार करण्यामागील उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाकडे 'लोन वुल्फ अटॅक'च्या शक्यतेनेही पाहिले जात असून कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी कनेक्शन आहे का, याचा शोध विविध तपास यंत्रणांच्या मदतीने घेतला जात आहे. तसेच आरोपी २०२५ मध्ये इराण आणि इराक दौऱ्यावर जाऊन आल्याची माहिती समोर आल्याने तपास अधिक गंभीरपणे सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande