सोनियांचा गाझावर लेख : भारताच्या भूमिकेवर लावले प्रश्नचिन्ह
भाजपकडून सोनियांवर मतांच्या राजकारणाचा घणाघाती आरोप नवी दिल्ली, 27 जून (हिं.स.) : इस्त्रायल-पॅलेस्टिन संर्घात बेचिराख झालेल्या गाझा पट्टीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी लेख लिहीला आहे. यात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत पारंप
सोनिया गांधी


भाजपकडून सोनियांवर मतांच्या राजकारणाचा घणाघाती आरोप

नवी दिल्ली, 27 जून (हिं.स.) : इस्त्रायल-पॅलेस्टिन संर्घात बेचिराख झालेल्या गाझा पट्टीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी लेख लिहीला आहे. यात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत पारंपरिक मित्र पॅलेस्टिन पासून दूर जात इस्त्रायलशी अधिक जवळीक साधल्याचा आरोप केलाय. तसेच गाझा संदर्भातील भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या लेखावर भाजपने टीका केली असून सोनिया गांधी मतपेटीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केलाय.

सोनिया गांधी यांच्या लेखावर भाजपने तीव्र टीका केली आहे. काँग्रेसवर परराष्ट्र धोरणापेक्षा मतपेढीच्या राजकारणाला प्राधान्य देत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. हमासने 2023 मध्ये इस्रायलच्या सीमावर्ती भागांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई केली. या संघर्षामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या अहवालाचा उल्लेख केला आहे. या अहवालात गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांविरोधात इस्रायलने नरसंहार केल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संघर्षात 20 हजारांहून अधिक मुलांचा मृत्यू झाला असून 44 हजारांपेक्षा अधिक मुले जखमी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. जागतिक समुदायाच्या निष्क्रियतेवरही त्यांनी टीका करत वाढते पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया असूनही हा संघर्ष थांबवण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. भारत सरकारवर टीका करत त्यांनी गाझातील नागरिकांच्या दुःखाविरोधात भारताने ठाम भूमिका घेतली नसल्याचा आरोप केला.

गाझा संदर्भात भारताने साधलेले मौन नैतिकदृष्ट्या अयोग्य असून राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनेही अनाकलनिय असल्याचे सोनिया गांधींनी लेखात म्हंटले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारत हा पॅलेस्टीनचा समर्थक राहिला असून त्या भूमिकेपासून दूर गेल्यास भारताच्या जागतिक प्रतिमेला धक्का बसू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, सरकारने पॅलेस्टिनी जनतेच्या हक्कांच्या समर्थनार्थ स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोनिया गांधी यांच्या लेखावर टीका करत काँग्रेस परराष्ट्र धोरणातही मतपेढीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भारताने गाझा आणि पॅलेस्टीन प्रश्नावर आपली भूमिका अनेकदा स्पष्ट केली असून मानवीय मदतही पुरवली असल्याचे त्यांनी सांगितले.

पूनावाला म्हणाले की, काँग्रेस नेहमी परराष्ट्र धोरणात मतपेढीला प्राधान्य देते. त्यामुळेच त्यांनी इस्रायलसोबत कधीही मजबूत संबंध प्रस्थापित केले नाहीत. तसेच, काँग्रेस हमासबाबत सहानुभूती दाखवते, मात्र इस्रायलवरील हल्ल्यांचा निषेध करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसेच सोनिया गांधी गाझातील मुस्लिमांसाठी आवाज उठवतात, रफाहबाबत प्रतिक्रिया देतात; मात्र ढाक्यातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत मौन बाळगतात. यावरून त्यांचे परराष्ट्र धोरणही मतपेढीच्या राजकारणावर आधारित असल्याचे दिसून येत असल्याचा टोला पुनावाला यांनी लगावला आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande