

- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी दिल्ली, 27 जून (हिं.स.) - अफगाणिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. यामुळे घाबरलेले नागरिक आपली घरे आणि कार्यालयांमधून बाहेर धावले. सध्या तरी यात कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यामध्ये अफगाणिस्तान, भारतासह आठ देशांमध्ये धक्के जाणवले आहेत. शनिवारी दिल्ली, एनसीआर, जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य अफगाणिस्तानमधील कालाफगनपासून सुमारे ८१ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली २१५ किलोमीटर खोलीवर होता. त्यामुळे केवळ अफगाणिस्तानमध्येच नव्हे, तर भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्येही याचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानातील अनेक भागांमध्ये जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवण्यात आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या भूकंपामुळे झालेल्या जीवित किंवा वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अफगाणिस्तान हा भूकंपप्रवण प्रदेश मानला जातो. भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमेजवळ असल्यामुळे या भागात वारंवार मध्यम ते तीव्र स्वरूपाचे भूकंप होत असतात. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता कायम असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी