
परभणी, 27 जून (हिं.स.) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी महानगराच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ श्री शिवाजी महाविद्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
पेपरफुटीला संरक्षण देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!, टीईटी पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करा!, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अभाविपच्या महानगर मंत्री गायत्री लाड यांनी सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटीमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागणे हे राज्याच्या परीक्षा व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या भविष्याशी असा खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरातील विविध भरती, प्रवेश व पात्रता परीक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटी आणि गैरप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा केली जाते; मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने शासनाची परीक्षा सुरक्षा व्यवस्था प्रभावी नसल्याचे स्पष्ट होत आहे. परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल ट्रॅकिंग, मजबूत सायबर सुरक्षा, उत्तरदायित्व निश्चित करणारी यंत्रणा आणि स्वतंत्र देखरेख प्रणाली तातडीने लागू करण्याची आवश्यकता असल्याचे अभाविपने नमूद केले.आंदोलकांनी, टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करावी, पेपरफुटी रॅकेटमधील सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, विद्यार्थ्यांवरील आर्थिक व मानसिक भार कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, राज्यातील सर्व स्पर्धा व पात्रता परीक्षांसाठी पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित व सुरक्षित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली तातडीने लागू करावी आदी मागण्या केल्या आहेत.आंदोलनात अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगरमंत्री गायत्री लाड, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महानगर सहमंत्री ऋषिकेश झाडे, विद्यार्थीनी प्रमुख अमरजा नारवडकर आदींनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis