थायलंड–म्यानमार सीमेलगत अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती मुंबई, 30 जून (हिं.स.) : थायलंड–म्यानमार सीमावर्ती भागात रोजगाराच्या आमिषाने नेऊन अडकविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्याची मा
गिरीश महाजन


आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई, 30 जून (हिं.स.) : थायलंड–म्यानमार सीमावर्ती भागात रोजगाराच्या आमिषाने नेऊन अडकविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

यासंदर्भात महाजन म्हणाले की, या प्रकरणाची तातडीने दखल घेत नाशिकसह महाराष्ट्रातील अडकलेल्या तरुणांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. राज्य शासन या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात येतील अशी ग्वाही महाजन यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील 25 हून अधिक तरुणांची फसवणूक झाली असून, देशभरातील 400 हून अधिक तरुण या रॅकेटमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींना बळी पडून काही तरुण थायलंडमध्ये गेल्यानंतर त्यांना म्यानमार सीमेवरील भागात नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या तरुणांकडून दररोज १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात असल्याची, तसेच नकार दिल्यास अमानुष छळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि बँकॉक येथील भारतीय दूतावासाशी समन्वय साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून असून केंद्र शासन, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रत्येक तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी तरुणांच्या कुटुंबीयांना धीर देत शासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींवर आंधळा विश्वास न ठेवता संबंधित कंपनी, एजंट आणि रोजगार प्रक्रियेची संपूर्ण पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande