चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर वाघाचा मृतदेह आढळला
चंद्रपूर, 30 जून (हिं.स.) : चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील चिकली चक क्र. 2 येथील बिगर वनक्षेत्रात मंगळवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सावली वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदा
चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर वाघाचा मृतदेह आढळला


चंद्रपूर, 30 जून (हिं.स.) : चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील चिकली चक क्र. 2 येथील बिगर वनक्षेत्रात मंगळवारी एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावली वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळ आणि पावसामुळे अनेक वीजखांब कोसळले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संबंधित भागात वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना, चितेगाव नियतक्षेत्रातील चिकली चक क्र. 2 च्या सर्व्हे क्रमांक 78 मध्ये कामगारांच्या निदर्शनास वाघाचा मृतदेह आला.

प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला असावा, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे.

मृत वाघाचे शवविच्छेदन राजोली रोपवाटिकेत करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande