
मुंबई, 27 जून (हिं.स.)। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या संशयावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. नीट, एमपीएससी आणि आता टीईटी अशा महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर सतत फुटत असल्याने सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याची टीका त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना सातत्याने घडत असून त्यामुळे राज्याची प्रतिमा मलीन झाली आहे. प्रत्येक वर्षी तरुण-तरुणींना आंदोलन करावे लागत आहे. अखेर देशातील युवकांनी आपल्या भविष्याची स्वप्ने कधी पाहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, रविवारी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृतपणे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. भिवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर काही संशयितांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आढळल्याची माहिती समोर आली. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता संबंधित प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक वातावरणात होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सूचना लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशीच परीक्षा स्थगित झाल्यामुळे राज्यभरातील लाखो परीक्षार्थींमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule