
जळगाव , 27 जून (हिं.स.) शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत याप्रकरणी दोघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री ते २६ जून रोजी सकाळी शिवाजीनगर, भगतसिंग चौक येथील एका घरात घरफोडी झाली होती. फिर्यादी सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले चौकशीदरम्यान दोघांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर