
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील २० टक्के निधीतून मागासवर्गीय प्रवर्गासाठी विविध कल्याणकारी योजना २०२६-२७ वर्षासाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, कडबा कुट्टी यंत्र, शिलाई मशीन, दुग्ध व्यवसाय (रु. ४० हजार अर्थसाहाय्य), शेळी पालन (रु. २५ हजार अर्थसाहाय्य), सायकल वाटप, शेतीसाठी पाईप व ठिबक संच, पिठाची गिरणी, वाचनालय, वेल्डिंग मशीन आणि मालवाहू रिक्षा आदी एकूण १६ प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या योजना १०० टक्के अनुदानावर आधारित असून, पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव दिनांक ३१ जुलै २०२६ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. आबासाहेब अरवत यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी
अर्जदार हा मागासवर्गीय (SC, ST, VJ-NT, SBC, नवबौद्ध) प्रवर्गातील असावा. योजनेसाठी तहसिलदारांचे जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. संगणक योजनेसाठी १२ वी उत्तीर्ण आणि एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
शिलाई मशीनसाठी संबंधित महिला शिवणकाम करत असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक आहे. शेतीविषयक योजनांसाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची शेती असल्याचा पुरावा जोडावा.
विद्युत उपकरणांसाठी ग्रामसेवकाचे विद्युत जोडणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis