चाकूर दरोडा प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा; एक आरोपी जेरबंद
लातूर, 27 जून (हिं.स.)। चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा १७
पोलीस कारवाई


लातूर, 27 जून (हिं.स.)। चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार ढोकी–मुरूड मार्गावर सापळा रचण्यात आला.

दरम्यान, महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील तिघांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून रवि मोहन काळे (वय १९, रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

आरोपीच्या ताब्यातील बोलेरोची झडती घेतली असता दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह नांदेड–चाकूर मार्गावर दोन कार अडवून प्रवाशांना मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली. तपासात जप्त करण्यात आलेले दागिने हे चाकूर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त मुद्देमाल

- ४३ ग्रॅम ५ मिली वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची चैन – ६.२२ लाख रुपये.

- महिंद्रा बोलेरो (एमएच-०६-जे-९८१९) – ११ लाख रुपये

एकूण जप्त मुद्देमाल : १७.२२ लाख रुपये

या गुन्ह्यातील अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे आणि कृष्णा मोतीराम शिंदे (सर्व रा. खामकरवाडी पारधीपेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) हे आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande