
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। स्वायत्त महाविद्यालयासंदर्भात नियमावली ठरविण्यासाठी माजी कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या स्वायत्तता घेतलेल्या पाच महाविद्यालयांना भेट देऊन सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व शैक्षणिक स्वायत्तता घेतलेल्या
वसंतराव नाईक महाविद्यालयातील तक्रारी संदर्भात सत्यता तपासण्यासाठी मा. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या आदेशावरून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी स्वायत्त झालेल्या चार महाविद्यालयासंदर्भातही नियमावली ठरविण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. आजपर्यंत शैक्षणिक स्वायत्तता (Academic Autonomy) घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये पाच शिक्षण संस्थांचा समावेश आहे. यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, एम आय टी महाविद्यालय, यशवंतराव औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालयाचा समावेश आहे. विद्यापीठाशी सलग्न असलेल्या या महाविद्यालयानी आतापर्यंत शैक्षणिक स्वायत्तता घेतलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कार्यपद्धती स्पष्ट होत नसल्यामुळे कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सदर समिती कठीण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी व कार्य परिषद पद्धतीने निश्चित करण्याकरिता तसेच नियमावली तयार करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु डॉ अशोक तेजनकर हे या समितीच्या सदस्य असणार आहेत. तसेच या समितीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस डांभारे, डॉ चंद्रकांत खिल्लारे (एस जी एम महाविद्यालय कराड). डॉ. रमेश कुंभार (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर) हे सदस्य असून मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. धनश्री महाजन या सदस्य सचिव असणार आहेत. सदर समिती या पाचही महाविद्यालयांना भेट देऊन आपला अहवाल मा.कुलगुरू डॉ विजय फुलारी यांना अहवाल सादर करणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis