
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या सहायक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी स्वयंरोजगार साधनसामग्री (Toolkit) खरेदी करण्याकरिता नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांना साधनसामग्रीसाठी कमाल १५,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
यात अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्याने शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
प्रशिक्षित दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत आहे.
अर्जदारांनी ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले युडीआयडी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत आणि घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज 'सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर' येथे सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis