परभणीत एफडीएच्या धडक कारवाईने पूर्णा शहरात खळबळ
परभणी, 27 जून (हिं.स.)। पूर्णा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक तपासणी मोहिमेमुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सलग विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासण्यांनंतर अनेक हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकान
पूर्णेत अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांनी खळबळ; हॉटेल-दुकाने बंद


परभणी, 27 जून (हिं.स.)। पूर्णा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक तपासणी मोहिमेमुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सलग विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासण्यांनंतर अनेक हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापने तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याचे चित्र शहरात दिसून आले. त्यामुळे संपूर्ण पूर्णा शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे आणि तुषार घोपे यांनी विविध आस्थापनांमध्ये अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवण व्यवस्था तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची सखोल तपासणी केली. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये या कारवाईमुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मात्र या मोहिमेचे स्वागत केले आहे.

विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान तुकाराम मुंडे या नावाची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. सामाजिक माध्यमांपासून व्यापारी वर्तुळापर्यंत सिर्फ नाम ही काफी है अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, ही प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. दरम्यान, पथकाने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहालाही भेट देऊन स्वयंपाकगृह, अन्नधान्याची साठवणूक, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी केली. विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा या तपासणीमागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande