लिपिकाचा प्रताप! ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून ८६ लाखांचा अपहार
जळगाव, 27 जून (हिं.स.) शासकीय वेतन प्रणालीचा गैरवापर करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार भुसावळ येथे उघडकीस आला आहे. येथील मृद व जलसंधारण उपविभागातील वरिष्ठ लिपिकाने ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार
लिपिकाचा प्रताप! ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून ८६ लाखांचा अपहार


जळगाव, 27 जून (हिं.स.) शासकीय वेतन प्रणालीचा गैरवापर करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार भुसावळ येथे उघडकीस आला आहे. येथील मृद व जलसंधारण उपविभागातील वरिष्ठ लिपिकाने ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. तनुज रवींद्र सैंदाणे (वय ३५, रा. पवन हिल्स, जळगाव) असं या लिपिकाचे नाव असून याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घोटाळ्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लिपिकाकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिले तयार करणे, पूरक देयके सादर करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा गैरवापर करत त्याने फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत ‘सेवार्थ’ प्रणालीत स्वतःच्या मूळ वेतनासह विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ करून घेतली. या फेरफारच्या आधारे तयार केलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी तथा उपअभियंता निनाद रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून संशयिताने ७० लाख ३८ हजार ३७ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि इतर कपातीच्या रकमेतही फेरफार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून सुमारे १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या निवृत्त वेतन खात्यात जमा करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande