जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम
रायगड, 27 जून (हिं.स.)। : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'' ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम
alilya


रायगड, 27 जून (हिं.स.)। : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना नव्याने उभारी देण्यासाठी ही व्यापक कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमुक्ती दिली जाणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) योजना लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर शासनाकडून उर्वरित पात्र रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाईल. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया महाआयटीच्या माध्यमातून ऑनलाइन व आधार क्रमांकावर आधारित करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, गाव चावडी, बँक शाखा, विकास संस्था आणि 'आपले सरकार सेवा केंद्र' येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच पात्र शेतकऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे माहिती दिली जाणार आहे.

लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य असून, ते बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जखात्यातील माहितीबाबत काही त्रुटी असल्यास तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर विशेष समितीचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जपात्र होऊन नवीन पीक कर्ज मिळवू शकणार असून, राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande