
नाशिक, 27 जून (हिं.स.)।
शहरात एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामांना वेग देण्यात येत असताना, दुसरीकडे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही नागरी अडचणी येऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या विशेष मान्सून टास्क फोर्सने प्रत्यक्ष मैदानात कामकाज सुरू केले. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे, नगरसेवक आणि ६ विभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध भागांतील कामांचा आढावा घेतला.
प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात थेट समन्वय निर्माण करत शहरातील विविध भागांमध्ये पावसाळी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या विशेष मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यात आली. महापालिकेने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १५, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १७, नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २४ तसेच सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ या सहा प्रभागांमध्ये विशेष पथके उतरवून प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबविली. प्रत्येक भागात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत संभाव्य पावसाळी अडचणी ओळखून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या. स्थानिक स्तरावर नागरिकांकडून वारंवार समोर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करत प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यावीत, याबाबत स्थळावरच निर्णय घेण्यात आले. पाहणीदरम्यान नालेसफाई, गटार व्यवस्थेची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्ड्यांची नोंद व दुरुस्ती, पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची
तपासणी, पाइपलाइन गळती, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच पावसाळ्यात तातडीने उद्भवू शकणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या मान्सून टास्क फोर्स अंतर्गत प्रत्येक विभागात नियुक्त करण्यात आलेली विशेष पथके सलग चार दिवस संबंधित प्रभागात कार्यरत राहून स्थानिक समस्या सोडविणार असून, त्यानंतर नियोजनानुसार पुढील प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV