
सिन्नर, 27 जून (हिं.स.)।
: नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्ग हा सिन्नर –
संगमनेर - आळेफाटा- नारायणगाव - मंचर - खेड चाकण या सरळ, तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य व सर्वाधिक लोकहिताच्या मार्गाने निश्चित करावा, या मागणीसाठी सिन्नर, संगमनेर व अकोले रेल्वे कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या संदर्भात रेल्वे विभागाशी चर्चा झाली. लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असून, या पार्श्वभूमीवर कृती समितीने मूळ मार्गाचा प्रस्ताव रद्द केल्याच्या विरोधात २९ जून रोजी समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे महामार्गावर प्रस्तावित केलेले रास्ता रोको आंदोलन एक महिन्यासाठी तात्पुरते स्थगित केले आहे.
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्गाचा मूळ आराखडा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने २९ जून रोजी गोंदे फाटा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनात सिन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार होते. या विषयावर प्रथम सिन्नर तहसील कार्यालय आणि नंतर नाशिक येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सत्यजित तांबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV