
बेंगळुरू, 27 जून (हिं.स.)। कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. कुकनूर तालुक्यात भानापूर येथे राष्ट्रीय महामार्ग ६३ वर हा अपघात घडला. मंत्रालयम कडे भाविकांना घेऊन जाणाऱ्या ओम्नी व्हॅनला डिव्हायडर ओलांडून आलेल्या एका मालवाहू वाहनाने धडक दिली.मृतांची ओळख केन्चम्मा बालेकायी (35), अमृता कोट्याल (25), रमेश बल्लारी (45), प्रवीण बालेकायी (40) आणि चिन्मय अशी पटली आहे. हे सर्व हावेरी जिल्ह्यातील रट्टीहल्ली तालुक्यातल्या कब्बार गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंबीय ओम्नी व्हॅनमधून मंत्रालयम कडे प्रवास करत होते. दरम्यान, जवळच्या रस्त्यावरून येणाऱ्या अशोक लेलँडच्या एका मालवाहू वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले, ते डिव्हायडर ओलांडून ओम्नी व्हॅनला समोरून धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की ओम्नी व्हॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.अपघातात जखमी झालेल्या चार जणांना बचाव पथकाने तातडीने कोप्पल जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.घटनेची माहिती मिळताच, कुकनूर पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule