
नाशिक, 27 जून (हिं.स.)।
: जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख वक्ते प्रकाश डिडोळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठीच परमवंदनीय आहेत. आपले संपूर्ण जीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित करून त्यांनी आपल्याला जिंकायला शिकविले. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तुमची इच्छाशक्ती प्रबळ व प्रयत्न प्रामाणिक असतील, तर अशक्य काहीच नाही. आत्मविश्वासाची, इच्छाशक्तीची व प्रामाणिक प्रयत्नांची गरज समाजाला आहे. शिवरायांचे पुण्यस्मरण करून आपल्या शौर्याच्या इतिहासाचे आकलन करणे, हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांसारख्या निष्ठावंत कार्याची, पवित्र उद्देश ठेवून कार्य करणार्या वृत्तीची आजही देशाला नितांत आवश्यकता आहे. हिंदू धर्म सहिष्णू आहे, पण आता नुसतं सहिष्णू असून चालणार नाही, आता प्रत्येक हिंदूला आपल्या धर्माविषयीची असीम श्रद्धा व्यक्त करून निर्भयतेने प्रतिकार करणे सुरू करावे लागेल. हिंदू संघटित शक्तीचा परिचय जगाला करून देणे हा ध्यास प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. मोगल आणि इतर परकीय आक्रमकांच्या जुलमी सत्तेला शह देत, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य (स्वराज्य) स्थापन केले. या राज्याभिषेकामुळे संपूर्ण हिंदुस्तानात एक आशेचा किरण निर्माण झाला, सांस्कृतिक एकात्मता: हा दिवस राष्ट्रीयत्वाचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देतो असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रकाश डिडोळकर यांनी केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, अमेय मसुरकर, विवेक आमले, मनीषा उपासनी, सतीश राय, गायत्री कदम मंजुषा आहिरे, दीपाली इंगळे, संजय भामरे, श्रीकांत देवरे, प्रदीप ढोले, सौरभ बावनकुळे, वर्षा पाटील, पूनम रानडे, चंद्रकांत डहांके, चेतन निकम, अरुण कुलकर्णी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV