लातूर - शिरूर अनंतपाळमध्ये अवैध दारू विक्रीचा भडका; ग्रामस्थांनी पेटवला ढाबा
लातूर, 27 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे अवैध दारू विक्रीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कायदा हातात घेतला. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा निषेध करण्या
अवैध दारू  विक्री विरोधात महिला आक्रमक


लातूर, 27 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे अवैध दारू विक्रीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कायदा हातात घेतला. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा निषेध करण्यासाठी जमावाने दारू विक्री होणारा ढाबा पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

शिवपूर गावात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री जोरात सुरू होती. या व्यवसायामुळे गावातील शांतता भंग होत असून, तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने महिलांसह गावकरी संतप्त झाले होते. अखेर, शनिवारी (२७ जून) ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित ढाब्यावर धडक दिली आणि आक्रमक होत तो ढाबा पेटवून दिला.

घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी परिसरात तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना एक लेखी निवेदन दिले असून, गावात सुरू असलेला अवैध दारूचा धंदा कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे. परिसरातील अवैध धंद्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शिरूर अनंतपाळ परिसरात खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांच्या या 'आक्रमक' पवित्र्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande