उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे, 27 जून (हिं.स.)। पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला असून, परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार अ
tet


पुणे, 27 जून (हिं.स.)।

पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला असून, परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेच्या पुढील तारखेबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे हजारो प्रामाणिक शिक्षक उमेदवारांच्या अनेक महिन्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरले आहे. शाळेच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रामाणिकपणे तयारी केली होती. मात्र, काही मोजक्या गैरप्रकार करणाऱ्यांमुळे सर्व उमेदवारांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पात्र उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी नव्या परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण पारदर्शकतेने पार पडावी, हाच परिषदेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande