
परभणी, 27 जून (हिं.स.)।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १० वाजता परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर परभणीतील उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा असल्याने राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करून ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या मतदारसंघातील शिवसैनिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने ते हिंगोली दौरा आटोपून शनिवारी सायंकाळी परभणीत मुक्कामी येणार असून, रविवारी सकाळी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देणे आणि आगामी राजकीय रणनीती स्पष्ट करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश मानला जात आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभेला निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis