
मुंबई, 27 जून (हिं.स.) - महाराष्ट्रात चाललंय काय? टीईटी पेपर ठाण्यात फुटतो आणि नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट आपल्या राज्यात सापडतात. परीक्षा कोणतीही असो, पेपर फुटणारच ही या सरकारची ओळख बनली आहे. दिवस-रात्र एक करून अभ्यास करणाऱ्या कष्टकरी परीक्षार्थीच्या भविष्याचा हा उघड उघड खून आहे, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
या लाचार सरकारला एक परीक्षा देखील सुरक्षितपणे घेता येत नाही, हेच यातून सिद्ध होतंय. सत्ताधाऱ्यांना केवळ स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यात रस आहे; महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वेदनेशी यांना काहीही देणंघेणं नाही. हे सरकारचे ढळढळीत अपयश आहे. जर सरकारला थोडी जरी लाज उरली असेल, तर त्यांनी तात्काळ यावर कायमचा बंदोबस्त करावा. परीक्षार्थीच्या कष्टाचा बाजार मांडणाऱ्या या राज्यकर्त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी