
लातूर, 27 जून (हिं.स.)।
चाकूर तालुक्यातील कलकोटी गावात अवैध दारूविक्रीचा विळखा घट्ट झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांचा संयम अखेर सुटला. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ, गावातील संतप्त महिलांनी एकवटत थेट अवैध दारूविक्रेत्याच्या घरात घुसून त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कलकोटी गावात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री सुरू होती. या दारूविक्रीमुळे गावातील तरुणाई व्यसनाधीन होत असून, घरातील शांतता भंग पावत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याने महिलांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी अखेर कायदा हातात घेत स्वतःच परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला. आज महिलांच्या एका गटाने थेट अवैध दारूविक्री करणाऱ्याच्या घरावर धडक दिली. यावेळी महिलांनी विक्रेत्याला जाब विचारला असता, शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त महिलांनी त्याला चोप दिला.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने आता तरी डोळे उघडून या अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि गावात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून आणि महिलांकडून जोर धरू लागली आहे. या धाडसी पवित्र्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis