टीईटी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसह व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा करा – अभाविप
मुंबई, 27 जून (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेशाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्य
टीईटी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसह व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा करा – अभाविप


मुंबई, 27 जून (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोंकण प्रदेशाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून या परीक्षेची तयारी करत होते. परीक्षेच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परिश्रमांशी आणि भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी. कॉम. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात शासनाला सीआयडी चौकशीचे आदेश द्यावे लागले. त्यानंतरही राज्यात TET परीक्षेबाबत प्रश्नपत्रिका फुटीचा संशय निर्माण होणे हे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

अभाविप कोंकण प्रदेश अशी मागणी करते की,

- प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.

- या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी.

- परीक्षेची नवीन तारीख शक्य तितक्या लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांची अनिश्चितता दूर करण्यात यावी.

- भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक व पारदर्शक यंत्रणा उभारण्यात यावी.

- परीक्षार्थ्यांना झालेल्या मानसिक, आर्थिक आणि प्रवासाच्या गैरसोयीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

यासंदर्भात अभाविप कोंकण प्रदेश मंत्री राहुल राजोरिआ म्हणाले, शिक्षक पात्रता (TET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा संशय ही केवळ प्रशासकीय चूक नसून लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी केलेली गंभीर प्रतारणा आहे. मुंबई विद्यापीठातील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतरही अशा घटना समोर येणे ही राज्याच्या परीक्षा व्यवस्थेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. या गैरप्रकारामागील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पारदर्शक व सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्याची हमी राज्य सरकारने द्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा हा खेळ अभाविप कदापि सहन करणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande