नांदेड जिल्ह्यातील ई-पॉस मशीन्स पुन्हा सुरू; धान्य वितरणासाठी मुदतवाढ
नांदेड, 27 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेल्या ई-पॉस (e-POS) मशीन्स शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्या
नांदेड जिल्ह्यातील ई-पॉस मशीन्स पुन्हा सुरू; धान्य वितरणासाठी मुदतवाढ


नांदेड, 27 जून (हिं.स.)।

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेल्या ई-पॉस (e-POS) मशीन्स शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य मिळावे यासाठी प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाने आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शासकीय नियमांनुसार, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीचा धान्य साठा वितरित करण्याचे आदेश होते. यासाठी १५ जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही रास्त भाव दुकानांमधून वेळेत धान्याची उचल न होऊ शकल्यामुळे सॉफ्टवेअरच्या स्वयंचलित नियमानुसार जिल्ह्यातील सुमारे २ हजार ई-पॉस मशीन्स १५ जून रोजी लॉक झाल्या होत्या. यामुळे बायोमेट्रिक (अंगठ्याची) पडताळणी बंद होऊन धान्य वितरण तात्पुरते ठप्प झाले होते.

या समस्येमुळे शिधापत्रिकाधारक आणि रास्त भाव दुकानदार दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने वरिष्ठ पातळीवर आणि शासनाकडे मुदतवाढीसाठी पाठपुरावा केला होता. नागरिकांचे हित लक्षात घेऊन शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वितरणासाठी ३० जून २०२६ पर्यंत अधिकृत मुदतवाढ मंजूर केली आहे.

प्रशासनाचे आवाहन: शासनाकडून मुदतवाढ मिळाली असुन, जिल्ह्यातील ई-पॉस मशीन्स अनलॉक (सुरू) झाल्या आहेत. ३० जूनच्या वाढीव मुदतीत सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरळीतपणे चालु आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी व रास्त भाव दुकानदारांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा आणि धान्य वितरणाची प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००००

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande