NEET नंतर TET चाही पेपर फुटला; भ्रष्ट परीक्षा व्यवस्थेचा आणखी एक चेहरा उघड - आ. सत्यजीत तांबे
मुंबई, 27 जून (हिं.स.)। NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली
NEET नंतर TET चाही पेपर फुटला; भ्रष्ट परीक्षा व्यवस्थेचा आणखी एक चेहरा उघड - आ. सत्यजीत तांबे


मुंबई, 27 जून (हिं.स.)। NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली असून, यामुळे तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. ही केवळ पेपरफुटीची घटना नसून, राज्यातील भ्रष्ट आणि ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

तांबे म्हणाले की, महाराष्ट्रात आता 'पेपरफुटी' हीच नवी 'परीक्षा पद्धत' झाली आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC-NET तसेच विविध प्रवेश आणि भरती परीक्षांमधील अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला. या सर्व घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

TET प्रकरण इतर परीक्षांपेक्षा अधिक गंभीर असल्याचे सांगताना तांबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे २० ते ३० वर्षे सेवा केलेले आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा देत आहेत. अशा वेळी पेपरफुटी होणे म्हणजे त्यांच्या नोकरीवर आणि कुटुंबाच्या भवितव्यावर घाला घालण्यासारखे आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ८० वर्षे झाली. जग AI आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले आहे. मात्र आपण अजूनही परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, MPSC चे निकाल वेळेत लावू शकत नाही, परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन अशा गोंधळातच अडकलेल्या आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तांबे यांनी सांगितले की, परीक्षा व्यवस्थेतील या त्रुटींविषयी त्यांनी नुकतेच विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले होते. मी तेव्हाही स्पष्ट सांगितले होते की, या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे. व्यवस्था पारदर्शक झाली तर अनेकांचे हितसंबंध धोक्यात येतील. त्यामुळे काहींना ही व्यवस्था सुधारलेलीच नको आहे, असा माझा ठाम आरोप आहे, असे ते म्हणाले.

केवळ आरोपींना अटक करून हा प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत तांबे यांनी परीक्षा प्रणालीची संपूर्ण पुनर्रचना करण्याची मागणी केली. ही केवळ पेपरफुटी नाही, तर बरबटलेल्या व्यवस्थेचा पर्दाफाश आहे. सरकारने हा अन्याय तातडीने थांबवून परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande