
ठाणे, 27 जून (हिं.स.)। - संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलामध्ये वनखात्याच्या वतीनेच एका भल्यामोठ्या भिंतीचे बांधकाम केले जात आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वनखात्याने भिंत बांधून कोणालातरी वन जमिनीचा मोठा भाग अलगद काढून देण्याचा घाट घातला जात आहे. ही कोणाची तरी सुपारीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला.
येऊरमध्ये वनखात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भिंतीची डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.
डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, येऊरमधील जंगलात मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. या भिंतीच्या अलिकडे पलिकडे, उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे, याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. सर्व जमीन वनखात्याची आहे, असे सांगितले जात आहे. मग, भिंत बांधून विभागणी का केली जात आहे? असा सवाल करून, इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी ही भिंत बांधण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलामध्ये सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? विशेष म्हणजे, ही भिंत बांधताना आडवे येत असलेली अनेक छोटी मोठी झाडेही स्वतः वनखात्यानेच तोडून रस्तादेखील केला आहे, असे डाॅ. आव्हाड म्हणाले.
या ठिकाणी असलेल्या भूखंडावर 20 वर्षांपूर्वी खासगी इसमाने भिंत बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस वनाधिकार यांनी भिंत पाडून टाकली होती. मात्र, आता वनखात्यानेच भिंत बांधून सदरचा भूखंड मोकळा करून देण्याची सुपारी घेतली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी आलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. येऊर गाव राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही, असे सांगत आहेत. मग, येऊरला जाणार्या लोकांकडून पैसे का घेता? 1995 च्या आदेशाचा दाखला देत ही भिंत बांधून खासगी लोकांचे भले करण्याचे काम वनखात्यानेच सुरू केले आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर