
अमरावती, 28 जून (हिं.स.)। मोर्शी शहरासह सातपुडा पायथ्याच्या आदिवासी भागात मृग नक्षत्र सुरू होताच कोयलारी या वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करण्याची परंपरा पुन्हा एकदा दिसून येत आहे. सध्या कोयलारीच्या झाडांना नवीन पालवी फुटल्याने अनेक आदिवासी महिला शेतावरून येताना किंवा जाताना या झाडाची कोवळी पाने अलगद तोडून घरी नेताना दिसत आहेत.
आदिवासी समाजामध्ये विविध वनस्पतींच्या पानांपासून भाजी तयार करण्याची जुनी परंपरा आहे. कोयलारीच्या पानांना स्वच्छ धुऊन कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो आदी मसाल्यांसह स्वादिष्ट भाजी तयार केली जाते. चवीला रुचकर आणि शरीराला हलकी वाटणारी ही भाजी आदिवासी कुटुंबांमध्ये विशेष आवडीने खाल्ली जाते. शेतात काम करणाऱ्या महिला पारंपरिक पद्धतीने तयार केलेली कोयलारीची भाजी डब्यात आणतात. यावेळी आदीवासी बांधव कोयलारीची भाजी चवीने खाताना दिसतात.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कोयलारीच्या झाडाची पाने आपट्याच्या पानांसारखी दिसतात. उन्हाळ्यानंतर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त असल्याचा समज आदिवासी समाजात आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात कोवळी पाने येताच या भाजीला विशेष मागणी वाढते. याचप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणाऱ्या तरोटा वनस्पतीलाही आदिवासी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. तरोट्याची कोवळी पाने भाजीसाठी वापरली जातात. तसेच या झाडाला येणाऱ्या शेंगांतील बियांचे विविध पदार्थ तयार केले जातात. लोकपरंपरेनुसार वातविकारांवरही या वनस्पतीचा उपयोग होत असल्याचे सांगितले जाते.
वनस्पतीच्या शास्त्रीय अध्ययनाची गरज
आदिवासी समाजाकडे वनस्पती, औषधी गुणधर्म आणि नैसर्गिक अन्नस्रोतांबाबत मोठा अनुभवसिद्ध ज्ञानसाठा आहे. मात्र हे ज्ञान प्रामुख्याने मौखिक परंपरेतून पुढे जात असल्याने ते जतन करणे आवश्यक आहे. शासन, संशोधन संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी दुर्गम भागातील आदिवासी महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून अशा वनस्पतींची माहिती संकलित करून त्यांचे शाखीय अध्ययन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी