
मुंबई, 28 जून (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसराचा दौरा करून पक्षाच्या दोन नवीन शाखांचे उद्घाटन केले. ईशान्य मुंबईतील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांचा या मतदारसंघातील हा पहिलाच दौरा ठरला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
राज ठाकरे यांनी विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील मनसे शाखेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शाखा कार्यालयातील अभ्यागत नोंदवहीत स्वाक्षरी करून शुभेच्छा नोंदवल्या. शाखा उद्घाटनानिमित्त परिसरात मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मात्र, उद्घाटनानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक किंवा प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. शाखेचे उद्घाटन करून ते तात्काळ पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यामुळे उपस्थित मनसैनिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी निराशा दिसून आली. राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी कोणतेही भाष्य न करता कार्यक्रम आटोपता घेतला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांच्या पक्षांतरावर भाष्य केले होते. उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश का केला, हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच 2029 च्या राजकीय समीकरणांचा उल्लेख करत त्यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले होते.
दरम्यान, मनसेचे पदाधिकारी गणेश चुक्कल यांनी राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. पक्ष विस्तारासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या निर्णयाचे मूल्यमापन जनता आगामी काळात करेल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे ईशान्य मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule