
अमरावती, 28 जून (हिं.स.)। आष्टी–परतवाडा मार्गावरील टाकरखेडा शंभू परिसरात शेतकरी दिलीपराव म्हस्के यांच्या शेतातील ७६५ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा टॉवर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टॉवरची अवस्था धोकादायक असल्याने शेतातील कामे करताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारा किंवा मुसळधार पावसामुळे टॉवर कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित वीज विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून टॉवरची दुरुस्ती अथवा आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी दिलीपराव म्हस्के यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी