
मुंबई, 28 जून (हिं.स.)। टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावर मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागावर जोरदार टीका केली आहे. भिवंडी येथे पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या घटनेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अमित ठाकरे यांनी एक्स वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, परीक्षा ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याची संधी असते; मात्र गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात परीक्षा व्यवस्थाच प्रश्नपत्रिका विक्रीचा धंदा बनल्याची टीका केली. नीट, एमएचटी-सीईटी, तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी आणि आता टीईटी अशा अनेक परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख करत, राज्यातील एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बारावीच्या परीक्षेदरम्यान ड्रोनच्या मदतीने कॉपी प्रकरणे उघडकीस आली आणि १०७ परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत टाकावे लागले, ही राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी म्हटले. ज्या मुलांना १० वी-१२ वीत साधे पासिंग मार्क्स मिळाले होते, ती मुलं चक्क १०० पर्सेन्टाईल मिळवून टॉपर येतात हा कोणता चमत्कार असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केला.
पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायद्यांची घोषणा करूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांना थेट तुरुंगात टाकण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केली. प्रत्येक वेळी चौकशी समिती नेमण्याची घोषणा करून सरकार जबाबदारी झटकत असल्याची टीकाही त्यांनी केली.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षेची तयारी करत असताना, पैसे देऊन प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्यांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत असल्याचे त्यांनी नमूद केले. या भ्रष्ट व्यवस्थेमुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत जात असून काही जण टोकाची पावले उचलत असल्याची खंत व्यक्त करत, सरकारने राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व्यापार करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा तरुणांचा संताप संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उफाळून येईल, असा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule