
- पशुवैद्यकीय चिकित्सालयाला अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज
अमरावती, 28 जून (हिं.स.) | शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्च करून अंजनगाव बारी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल पाच महिने उलटले तरी उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्याने ही इमारत अद्याप वापराविना पडून आहे. परिणामी पशुपालकांना जुन्याच जीर्ण व अपुऱ्या जागेच्या इमारतीत जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत असून मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
नवीन इमारतीमध्ये प्रशस्त उपचार कक्ष, कार्यालयीन व्यवस्था, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार व इतर आवश्यक सुविधा उपलब्धअसूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याचा लाभ पशुपालकांना मिळत नाही. दुसरीकडे जुना दवाखाना जीर्ण अवस्थेत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या शेतकरी व पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या दवाखान्यात महिला पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ कार्यरत असून, इतर अनेक आवश्यक पदे रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. पशुधन सहायक, प्रयोगशाळा परिचर, आरोग्य सेवक, शिपाई/परिचर तसेच इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा प्रभावीपणे देताना अडचणी निर्माण होत आहेत. अंजनगाव बारी व परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांनी नवीन दवाखान्याचे तातडीने उद्द्घाटन करून सेवा सुरू करावी, तसेच रिक्तपदे भरून दर्जेदार पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पशुवैद्यकीय चिकित्सालयाला अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरजअंजनगाव बारी परिसरातील १० गावांसाठी हे एकमेव शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे. सध्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ यांच्यावरच संपूर्ण कामकाजाची जबाबदारी असून त्यांना बडनेरा व अंजनगाव बारी या दोन्ही ठिकाणांचा कारभार सांभाळावा लागतो, तसेच पशुधन सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, आरोग्यसेवक, शिपाई व इतर सहायक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी