विलास घुले हत्येप्रकरणी तांत्रिक पुराव्यांवर भर; संशयास्पद वाहनासह सर्व बाजूंचा तपास सुरू - एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम
बीड, 28 जून (हिं.स.)। केज तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विलास घुले खून प्रकरणी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस व्यंकटराम यांनी तपासाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. हे संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण पूर्णपणे वस्
विलास घुले हत्येप्रकरणी तांत्रिक पुराव्यांवर भर; संशयास्पद वाहनासह सर्व बाजूंचा तपास सुरू - एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम


बीड, 28 जून (हिं.स.)।

केज तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विलास घुले खून प्रकरणी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस व्यंकटराम यांनी तपासाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. हे संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित (एव्हिडन्स बेस्ड) पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याचे कपडे, हत्येसाठी वापरलेला चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली जीप (एमएच ४४ झेड ९५४२) पोलिसांनी यापूर्वीच हस्तगत केली आहे. तसेच, या गुन्ह्यातील सर्व नऊ आरोपींना पोलिसांनी याआधीच अटक केली असून सखोल तपास सुरू आहे.

फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर, खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांना एसआयटीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात त्यांची सुमारे चार तास कसून चौकशी करण्यात आली. आयपीएस व्यंकटराम यांनी सांगितले की, सौरव सोनवणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले असून त्यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या चौकशीदरम्यान सौरव सोनवणे घटनेच्या वेळी कुठे होते, त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध किंवा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सखोल अभ्यास केला जात आहे. घटनास्थळी संशयास्पद 'थार' गाडी गेल्याचा आणि आरोपींना पळवून लावण्यात आल्याचा जो आरोप केला जात आहे, त्या अनुषंगानेही ते वाहन नेमके कुठे होते, त्याची वेळ काय होती, या सर्व टेक्निकल आणि डिजिटल बाबींची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. या तांत्रिक विश्लेषणातून जे काही सत्य समोर येईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एसआयटी प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande