मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना - अहमदपूर येथील १४ युवकांना नियुक्तीपत्र प्रदान
लातूर, 28 जून (हिं.स.)। :महाराष्ट्र शासनाच्या ''मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने''अंतर्गत जिल्हा कौशल्य, विकास व रोजगार कार्यालय, लातूर आणि सिद्धी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २८ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मुख्यमंत्री युवा  कार्य प्रशिक्षण योजना


लातूर, 28 जून (हिं.स.)।

:महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'अंतर्गत जिल्हा कौशल्य, विकास व रोजगार कार्यालय, लातूर आणि सिद्धी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २८ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अहमदपूर व चाकूर तालुक्यातील १४ सुशिक्षित युवक-युवतींना सिद्धी शुगर कारखान्यात ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रुजू आदेशाचे वाटप राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, तालुक्यातील युवक-युवतींनी या योजनेचा पूर्ण लाभ घेऊन ११ महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करावे. विशेष म्हणजे, शासनाच्या मानधना व्यतिरिक्त, जे प्रशिक्षणार्थी संबंधित महिन्यात सर्व दिवस कामावर उपस्थित राहतील, अशा प्रशिक्षणार्थ्यांना सिद्धी शुगर कारखान्याकडून दरमहा पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मंत्री महोदयांनी सांगितले की, जुलै महिन्यात अहमदपूर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या २८ युवक-युवतींना सिद्धी शुगर कारखान्यात प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. त्याचा तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा.

तसेच, ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची हमी नसली तरी, कारखान्यात जागा रिक्त झाल्यावर टेक्निकल टीमच्या शिफारशीनुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande