छ. संभाजीनगरमधील जि.प.च्या नव्या इमारतीला लोकार्पणापूर्वीच गेले तडे
छत्रपती संभाजीनगर, 28 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीला लोकार्पणापूर्वीच तडे गेले. यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच ठेकेदाराविरोधात तातडीने चौकशी करून जब
छ. संभाजीनगरमधील जि.प.च्या नव्या इमारतीला लोकार्पणापूर्वीच गेले तडे


छत्रपती संभाजीनगर, 28 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीला लोकार्पणापूर्वीच तडे गेले. यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच ठेकेदाराविरोधात तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्याकडे केली.

इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची 'सकाळ'ने पाहणी केली असता जिल्हा परिषद सदस्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद सदस्य विद्या रमेश गायकवाड यांनीही या निकृष्ट बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. त्यांनी निवेदनात म्हटले, नव्या इमारतींमध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. भेगा पडणे, निकृष्ट साहित्याचा वापर, प्लास्टर आणि इतर कामांमध्ये त्रुटी आढळून येत आहेत.

त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारलेल्या इमारतींच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली. या कामाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची गरज आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराचे प्रलंबित देयक तत्काळ स्थगित करावे, राज्य शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत इमारतींची तांत्रिक तपासणी, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता व कामाची मानके तपासावीत, शिवाय चौकशी अहवालानंतर दोषी अधिकारी, अभियंते व ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

-------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande