
परभणी, 28 जून (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील मौजे कसर येथे कृषी विभागाच्यावतीने बीबीएफ (ब्रॉड बेड फरो–रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक आज घेण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या पद्धतीमुळे अतिवृष्टीच्या काळात शेतातील पाण्याचा योग्य निचरा होतो, तर कमी पाऊस झाल्यास जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन सोयाबीन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ साधावी, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे यांनी बीबीएफ यंत्राची कार्यपद्धती, बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि या तंत्रज्ञानाचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत आधुनिक शेती पद्धतींची माहिती दिली.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पारवे, सरपंच विठ्ठल शिंदे, मंडळ कृषी अधिकारी सुनील कदम, सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्निल देशमुख, गजानन घुगे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मौजे कसरसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis