
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी चिपळूण येथे १०० टक्के राज्य शासनाच्या अनुदानातून मत्स्यबीज केंद्र उभारण्यात येणार आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आल्यास पूर्णपणे शासकीय अनुदानातून मत्स्यबीज केंद्र सुरू करण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी निकम यांना कळविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मत्स्यबीज केंद्र उपलब्ध नसल्याने गोड्या पाण्यातील मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दर्जेदार मत्स्यबीज मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित ४२ तलाव असून, त्यासाठी दरवर्षी सुमारे ३६ लाख मत्स्य बोटुकलींची आवश्यकता असते. मात्र जिल्ह्यात उत्पादनाची सुविधा नसल्याने मत्स्य उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे.
चिपळूण तालुका जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून वाशिष्ठी नदीसह उपलब्ध जलस्रोत, भविष्यातील रिव्हर रॅंचिंग प्रकल्प आणि नव्याने उभारले जाणारे तलाव यांचा विचार करता येथे मत्स्यबीज केंद्र उभारणे अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भूमिका आमदार निकम यांनी शासनाकडे मांडली होती.
प्रस्तावित मत्स्यबीज केंद्रात रोहू, कटला, मृगळ आदी गोड्या पाण्यातील माशांचे बीज व गुणवत्तापूर्ण फिंगरलिंग्जचे उत्पादन होणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर मत्स्यबीज उपलब्ध होईल. परिणामी मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी